भूम – आज भूम नगर परिषदेत शहरातील अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. घनकचरा व्यवस्थापन, लाड-पागे समितीमार्फत अनुकंपाधारकांना नोकऱ्या, कर्मचाऱ्यांची प्रलंबित वैद्यकीय बिले तसेच इतर तातडीचे विषय अजेंड्यावर होते. मात्र, जबाबदारीच्या पदावर असलेले मुख्याधिकारीच सभेला गैरहजर राहिल्याने संपूर्ण प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
मुख्याधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे संतप्त नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाच्या निष्काळजी व बेजबाबदार कारभाराचा निषेध केला. अखेर गोंधळाच्या वातावरणात सभा रद्द करण्याची वेळ आली.
दरम्यान, भूम नगर परिषदेचा प्रभारी पदभार नायब तहसीलदार प्रवीण जाधव यांच्याकडे आहे. मात्र, नगर परिषद प्रशासनाचा कोणताही ठोस अनुभव नसल्यामुळे शहरातील कामे ठप्प झाल्याची टीका होत आहे. त्यातच सभेच्या दिवशीही प्रशासनाने निष्काळजीपणा दाखवल्याने नागरिकांच्या प्रश्नांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकारामुळे भूम नगर परिषदेच्या कारभारावर नाराजीचे सावट पसरले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.











