पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाला मराठा समाजाचा विरोध, जरांगे पाटलांच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने संताप; स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते ध्वजारोहणाची मागणी
धाराशिव – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहणाला विरोध करण्याचा इशारा अखंड मराठा समाजाने दिला आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याऐवजी मराठवाडा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण करावे, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकशाही आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यासाठी मुंबईकडे जात असताना शासनाने त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
एकीकडे स्वातंत्र्य, लोकशाही आणि हक्कांचा इतिहास सांगायचा, तर दुसरीकडे न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दाबायचा, हा दुटप्पीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा संतप्त सूर अखंड मराठा समाजाने व्यक्त केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, १७ सप्टेंबरच्या ध्वजारोहण कार्यक्रमात विरोध नोंदविण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा सन्मान करा, लोकशाहीचा आवाज दाबू नका आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मार्ग मोकळा करा, अशी मागणी अखंड मराठा समाजाने केली आहे.
आता प्रशासन या इशाऱ्याची दखल घेऊन काय भूमिका घेते, याकडे धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे.











