बार्शी तालुक्यातील पांगरी, घारी परिसरात शेतकऱ्यांशी संवाद; तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश
धाराशिव – बार्शी तालुक्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी सोयाबीनसह विविध खरीप पिके व फळबागा वाळत चालल्या असून, उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बार्शी तालुक्यातील पांगरी आणि घारी परिसरातील शेतशिवारात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी सोयाबीन पिकांची झालेली अवस्था तसेच फळबागांना पाण्याअभावी निर्माण झालेली परिस्थिती जाणून घेतली.
खासदार ओमराजे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि व्यथा समजून घेतल्या. पावसाने आणखी ओढ दिल्यास पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता असल्याने शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि आवश्यक ती शासकीय मदत मिळावी, यासाठी प्रशासनाला पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासनही ओम राजेनिंबाळकर यांनी दिले. पावसाच्या खंडामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाकडून तातडीची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी दिली.











