लोकप्रतिनिधी लक्ष देणार की जाणूनबुजून दुर्लक्ष करणार?
तुळजापूर – धार्मिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूर शहरात अवैध दारू विक्री, मटका, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा खुलेआम व्यवसाय जोरात सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या अवैध धंद्यांमुळे शहरातील सामाजिक वातावरण बिघडत असून, तरुण पिढी व्यसनांच्या गर्तेत अडकत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. अवैध दारू आणि मटक्याचा सुळसुळाटतुळजापूर शहर व परिसरात अवैध दारू विक्रीचे अड्डे उघडपणे सुरू असल्याची चर्चा आहे. तसेच मटका जुगार अनेक ठिकाणी बिनधास्तपणे चालू असून, यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडत आहे. गरीब व मध्यमवर्गीय नागरिक यात अधिक भरडले जात असल्याचे वास्तव आहे.
गुटखा-माव्यामुळे तरुणांचे आरोग्य धोक्यात
शासनाने बंदी घातली असतानाही गुटखा, मावा, सुगंधित तंबाखू तुळजापूरमध्ये सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शाळा, कॉलेज परिसरातही हे पदार्थ मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.कारवाई होतेय की केवळ दिखावा?पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणा कधीकधी कारवाई करत असल्याचे दाखवले जाते; मात्र ही कारवाई तात्पुरती व दिखाव्यापुरतीच आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. काही दिवसांतच पुन्हा तेच धंदे सुरू होत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
लोकप्रतिनिधींची जबाबदारी काय?
या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरपरिषद व प्रशासकीय यंत्रणा लक्ष देणार आहेत की याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. निवडणुकीच्या वेळी आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात अवैध धंद्यांवर ठोस कारवाई का होत नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.नागरिकांमध्ये रोषअवैध दारू, मटका आणि गुटख्यामुळे गुन्हेगारी, कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी आणि आरोग्य समस्या वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत आहेत.
कठोर कारवाईची मागणी
तुळजापूरमधील अवैध धंद्यांवर विशेष मोहीम राबवून कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, दोषींवर कडक कारवाई करावी आणि यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे











