धाराशिव – धाराशिवच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असलेले चार नगरसेवक आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाकडे वळल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपच्या कमळाकडे जाण्यासाठी निघालेली राजकीय गाडी अचानक धनुष्यबाणाच्या दिशेने वळल्याने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, या चार नगरसेवकांची खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती असून, आज सायंकाळपर्यंत ठाण्यात त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चेने आधीच धाराशिवच्या राजकारणात वातावरण तापलं होतं. मात्र, ऐनवेळी हे नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होत असल्याची माहिती समोर आल्याने भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला हा मोठा राजकीय धक्का असल्याची चर्चा रंगली आहे.
भाजपच्या कमळासाठी तयार झालेली गाडी धनुष्यबाणाच्या दिशेने वळली…
जे नगरसेवक कालपर्यंत भाजपमध्ये जाणार असल्याची खात्रीलायक माहिती होती. भाजपने देखील त्या दिशेने यंत्रणा कामाला लावली होती. मात्र ती यंत्रणा ‘फुसकी’ निघाल्याने भाजपला ‘चकली’ देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत डेरे दाखल होणार आहेत. आता या चार नगरसेवकांच्या प्रवेशानंतर धाराशिव नगरपरिषदेच्या राजकारणात नेमकी कोणती नवी समीकरणं तयार होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.











