शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांची माहिती
धाराशिव – धाराशिव नगरपरिषदेत नगरसेवकांच्या पक्षांतरावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्षासोबतच मतदारांशीही गद्दारी केली आहे. या पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांची गय केली जाणार नाही, असा आक्रमक इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिला आहे.
पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहितीही जाधवर यांनी दिली. त्यामुळे नगरसेवकांच्या पक्षबदलाचा मुद्दा आता थेट न्यायालयाच्या दारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, ‘पेट्या-खोके किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता पक्षाशी इमान राखणाऱ्या रवी वाघमारे आणि राज निकम यांचा पक्षाला अभिमान आहे,’ असे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी म्हटल्याचे जाधवर यांनी सांगितले.
नगरसेवकांच्या पक्षांतरावरून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईसाठी ठाकरे गट न्यायालयात जाणार असल्याने पुढील काळात या प्रकरणाला कायदेशीर वळण मिळण्याची शक्यता आहे.











