धाराशिव – मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना ज्येष्ठ नेते तथा खासदार शरदचंद्र पवार हे २ आणि ३ नोव्हेंबर रोजी मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दिली.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी शरद पवार परंडा आणि बार्शी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या जाणून घेतील. त्यानंतर ते धाराशिव येथे मुक्कामी असणार आहेत.
३ नोव्हेंबर रोजी कळंब आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहेत. स्थानिक शेतकरी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने धाराशिवसह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदी, नाले, विहिरी आणि जलसाठ्यांमधील पाण्याची पातळी घटल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसह पशुपालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.दुसरीकडे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. डोक्यावरील कर्ज, वाढता उत्पादन खर्च आणि आगामी रब्बी हंगामाबाबतची अनिश्चितता यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पशुधनासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करणेही कठीण झाले आहे.या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चारा छावण्या सुरू करणे, पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणे, पीक नुकसान भरपाई, पीक विमा आणि आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या दौऱ्याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.











