धाराशिव – नगर परिषदे अंतर्गत शहरातील घर ते घर कचरा संकलन करणे, सफाई करणे, गटार सफाई, या कामाची वार्षिक निविदा शासन निर्णयाला डावलुन राबवण्यात आलेली असल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेविका सोनाली वाघमारे, नगरसेवक पंकज पाटील यांनी शासनाकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केली आहे. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,नगर परिषदेने शहरातील घनकचरा व्यवस्थापन कामाची वार्षिक निविदा प्रक्रिया राबवली आहे. ही प्रक्रिया करताना शासन निर्णयाला डावलुन राबविली आहे. नागरी, स्थानिक संस्था मार्फत राबविण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रिये बाबत 2018 च्या शासन निर्णयात नियम दिलेला आहे की सक्षम प्राधिकाऱ्यांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्राप्त केल्याशिवाय निविदा प्रसिध्द करु नये तसेच कार्यारंभ आदेश देवु नयेत. असे असतानाही नगर परिषद धाराशिव यांनी जाहिर निविदा सहा जुलै २०२६ रोजी प्रसिध्द केलेली आहे. कामाची तांत्रिक मंजुरी २४ ऑगस्ट २०२६ रोजी देण्यात आली असुन प्रशासकीय मंजुरी दि.२९ सप्टेंबर २०२६ रोजी मिळालेली आहे. त्यावरुन असे लक्षात येते की, तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेच्या आगोदरच निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. शासन नियमाच उल्लंघन करुन करण्यात आलेली ही प्रक्रिया आहे. जर तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता घेण्यात आलेली नव्हती तर निविदेमध्ये निविदा रक्कम कशाच्या आधारे केली हे शासनाने सांगितले पाहिजे. त्यामूळे नगर परिषद धाराशिव अंतर्गत शहरातील घर ते घर कचरा संकलन करणे, सफाई करणे, गटार सफाई, या कामाची वार्षिक निविदा प्रक्रिया बेकायदेशीर असून ही प्रक्रिया रद्द करावी. तसेच ही फेरनिविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात यावी अशी मागणी करून तसे न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशाराही सोनाली वाघमारे यांनी सरकारला दिला आहे.
आंधळं दळतंय आणि कुत्रं पिठ खातंय या म्हणी प्रमाणे नगर परिषदेचा कारभार सुरु आहे. कचरा व्यवस्थापन या महत्वाच्या विषयाकडेही हे फक्त कमाईच साधन म्हणून बघत आहेत. हे काम आपल्याला मिळावं यासाठी आवश्यक तो प्रक्रिया देखील बेकायदेशीर रित्या राबविली जात असेल तर नियम बनवायचे कशासाठी?
सोनाली वाघमारे – नगरसेविका
प्रशासनाने ही नियम डावलून केलेली प्रक्रिया कोणाच्या दबावाखाली केली आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे बटिक नसून नागरिकाचे सेवक आहात याची जाण ठेवा. विरोधक संपले असे गृहित धरून आम्ही काही करू या गैरसमजात भाजपने राहु नये.
पंकज पाटील – नगर सेवक











