अटकपूर्व जामीन मंजूर; राजकीय संघर्षानंतर सुरू झालेल्या न्यायालयीन लढाईत महत्त्वाचा निर्णय
धाराशिव – जिल्ह्यातील तेरखेडा येथे दोन राजकीय गटांमध्ये झालेल्या जोरदार संघर्षाच्या प्रकरणात जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते संदेश उर्फ विकी चव्हाण आणि त्यांचे बंधू अक्षय चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दोन्ही बंधूंच्या वतीने ॲड. श्रीकांत कवडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
२ ऑगस्ट २०२६ रोजी वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील बसस्थानक चौक परिसरात दोन राजकीय गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. या घटनेत दोन्ही बाजूंच्या लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत शिवीगाळ, हाणामारी आणि दगडफेक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रणजीत गाडे यांनी ३ ऑगस्ट रोजी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, या संघर्षात दोन्ही गटांतील लोकांनी परस्परांवर हल्ले केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत घोडके यांच्या हातावर लाकडी काठीने मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, दोन्ही गटांतील सात ते आठ जण जखमी झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार एकूण ४६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर नावांचा समावेश
तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर संदेश उर्फ विकी चव्हाण यांच्यासह अक्षय चव्हाण यांचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी दोन्ही बंधूंनी सुरुवातीला भूम येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. यानंतर दोघांनी ॲड. श्रीकांत कवडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने आपली बाजू मांडत अटकपूर्व जामिनाची मागणी केली.
सुनावणीवेळी बचाव पक्षाने राजकीय वैमनस्यातून या प्रकरणात गोवण्यात आल्याचा युक्तिवाद केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संदेश चव्हाण यांच्या हातात लाकडी दांडा दिसत असल्याचे नमूद असले, तरी त्यांनी नेमकी कोणाला मारहाण केली, हे स्पष्ट होत नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच प्रकरणातील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि अन्य बाबींचाही विचार करून दोन्ही बंधूंना अटकपूर्व जामीन देण्याची विनंती करण्यात आली. बचाव पक्षाचे युक्तिवाद आणि प्रकरणातील परिस्थिती विचारात घेत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संदेश उर्फ विकी चव्हाण आणि अक्षय चव्हाण या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर केला. तेरखेड्यातील राजकीय संघर्षानंतर सुरू झालेल्या न्यायालयीन लढाईत हा निर्णय दोन्ही बंधूंसाठी महत्त्वाचा दिलासा मानला जात आहे.











