धाराशिव – धाराशिव नगरपरिषदेच्या रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदासाठी गुरुवार, ३ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तत्कालीन उपनगराध्यक्ष अक्षय संजीव डोबळे यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. आता या पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित झाल्याने शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
नगरपरिषदेचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात ही निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत अर्जांची छाननी, तर १२.३० ते १२.४५ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल.
या निवडणुकीत उपनगराध्यक्षपदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्यास नगरसेवकांना हात उंचावून मतदान करावे लागणार आहे. मतदानाची नोंद सभेच्या कार्यवृत्तात घेतली जाणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे चित्रिकरणही केले जाणार आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही परिस्थितीत सभा तहकूब केली जाणार नसल्याचे विषयपत्रिकेत स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, धाराशिव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान गाजलेला ‘कमळ और तुतारी एकीच है’ हा संवाद पुन्हा चर्चेत आला आहे. निवडणुकीनंतर तुतारीच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे फारसे पाहायला मिळाले नसल्याने त्यांच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दुसरीकडे, भाजपमध्येही उपनगराध्यक्षपदासाठी अनेक नगरसेवक इच्छुक असल्याची चर्चा आहे. भाजप हे पद स्वतःकडेच कायम ठेवणार की नव्या राजकीय समीकरणातून तुतारीला संधी देणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्यामुळे उपनगराध्यक्षपदाची निवडणूक केवळ रिक्त पद भरण्यापुरती मर्यादित न राहता धाराशिवमधील सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय समीकरणांची कसोटी ठरणार आहे. ३ डिसेंबर रोजी उपनगराध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.











