बीडमध्ये १,५०० धावपटूंचा सहभाग; प्रशासकीय अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव – बीड येथील बालाघाट हिल हाफ मॅरेथॉनच्या पाचव्या पर्वाला सेरेंटिका रिन्यूएबल्सने पाठबळ दिले. योग प्रतिष्ठानच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी आयोजित या स्पर्धेत सुमारे १ हजार ५०० धावपटूंनी सहभाग नोंदविला. आरोग्य, तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारी ही स्पर्धा बालाघाटच्या निसर्गरम्य डोंगररांगांच्या सान्निध्यात उत्साहात पार पडली.
इमामपूर रोडवरील श्री ज्योतिबा मंदिर परिसरातून सकाळी ६ वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. एआयएमएस प्रमाणित धावमार्गावर २१.१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा तीन गटांत स्पर्धा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, सेरेंटिकाचे एव्हीपी टी. एन. हेमनाथन आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ झाला.
या स्पर्धेत आयुक्त अमोल येडगे यांनी स्वतः २१.१ किलोमीटर धावून हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. विविध जिल्ह्यांतील पोलीस व प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, उद्योजक तसेच पुणे, जळगाव, भुसावळ येथील धावपटूंनीही सहभाग घेतला.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात पवनऊर्जा प्रकल्प विकसित करणाऱ्या सेरेंटिका रिन्यूएबल्सने या स्पर्धेला दिलेले पाठबळ हे स्थानिक समुदायांच्या विकासाप्रती असलेल्या बांधिलकीचा भाग असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. वाशी येथील शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा विकास तसेच युवक आणि महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती कंपनीचे एव्हीपी टी. एन. हेमनाथन यांनी दिली.
धाराशिवमध्ये ८३० मेगावॅटचे पवनऊर्जा प्रकल्प
सेरेंटिकाकडून धाराशिव जिल्ह्यात कळंब, वाशी आणि भूम तालुक्यांत ४३० मेगावॅट, तर धाराशिव आणि तुळजापूर तालुक्यांत ४०० मेगावॅट क्षमतेचे पवनऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत. या प्रकल्पांची एकत्रित क्षमता ८३० मेगावॅट आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मितीसोबतच स्थानिक पातळीवर आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे यानिमित्ताने सांगण्यात आले.











