आमदारांच्या स्वीय सहाय्यकाच्या उपस्थितीत फोटोसेशन; सामान्य भाविकांची मात्र हेळसांड
तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्थेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. सोलापूर येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अरुण प्रभाकर रोडगे ऊर्फ दादा रोडगे यांनी थेट देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करून दर्शन घेतल्याचा आणि फोटोसेशन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वीय सहाय्यक सुजित जमदाडे उपस्थित असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या प्रकारामुळे मंदिर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी याप्रकरणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीसोबत संबंधित छायाचित्रेही सादर करण्यात आली असून, प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, महंत वाकोजीबुवा यांच्या माध्यमातून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वीय सहाय्यक सुधीर जमदाडे आणि नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे यांच्या मदतीने रोडगे यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळाल्याचा आरोप आहे. रोडगे यांच्यावर यापूर्वी तडीपारीसारखी कारवाई झाल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे.
दररोज हजारो भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात येतात. वृद्ध, महिला, लहान मुले आणि सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते. गर्दीमुळे अनेकदा धक्काबुक्कीचा सामना करावा लागतो. मात्र, काही व्यक्तींना थेट गाभाऱ्यात प्रवेश दिला जात असल्याच्या आरोपामुळे व्हीआयपी दर्शन व्यवस्थेतील कथित दुजाभावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राजकीय संबंध आणि पदाचा वापर करून नियमबाह्य प्रवेश दिला जात असल्यास, हा प्रकार गंभीर असल्याची भूमिका तक्रारदारांनी मांडली आहे.
देवीच्या छायाचित्रणावर बंदी असताना फोटोसेशन कसे?
श्री तुळजाभवानी देवीचे फोटो आणि व्हिडिओ काढण्याबाबत मंदिर संस्थानने यापूर्वीच नियमावली लागू केली आहे. देवीचे छायाचित्रण अधिकृतरीत्या मंदिर संस्थानकडूनच केले जावे, तर इतरांनी कोणत्याही विधीदरम्यान किंवा अन्य वेळी वैयक्तिकरीत्या फोटो अथवा व्हिडिओ काढू नयेत, अशी नोटीस मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने यांनी काढली होती. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर देवुळ कवायत कलम २४ आणि २५ अन्वये कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
अशा परिस्थितीत गाभाऱ्यात फोटोसेशन झाल्याचा आरोप समोर आल्याने संबंधितांवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मंदिर संस्थानच्या नियमांचे पालन सामान्य भाविकांकडून अपेक्षित असताना, कथित व्हीआयपी व्यक्तींना वेगळे निकष लावले जात आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
गाभाऱ्यात प्रवेशाची परवानगी कोणी दिली?
रोडगे यांना कोणाच्या परवानगीने आणि कोणत्या अधिकाराखाली गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला, याची सखोल चौकशी करावी. मंदिराच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या व्हीआयपी वशिलेबाजीला आळा घालावा, अशी मागणी अमरराजे कदम यांनी निवेदनातून केली आहे.
सामान्य भाविकांना समान पद्धतीने आणि सुलभतेने दर्शन मिळणे अपेक्षित असताना, नियमबाह्य प्रवेशाच्या आरोपामुळे मंदिर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात मंदिर संस्थान आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, तसेच संबंधितांवर कारवाई होते का, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.











