मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी बँकांकडून होणाऱ्या सक्तीच्या वसुलीविरोधात खासदार ओमराजे निंबाळकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
धाराशिव – जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतमालाचे उत्पादन घटल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मायक्रो फायनान्स कंपन्या तसेच इतर खासगी बँकांकडून कर्जदारांकडे कर्जाच्या हप्त्यांची सक्तीने वसुली केली जात असल्याच्या तक्रारी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी आणि महिलांवर या वसुलीमुळे अतिरिक्त आर्थिक ताण निर्माण होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा विचार करून मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी बँकांकडून सुरू असलेली कर्जवसुली तात्पुरती थांबविण्याबाबत संबंधितांना तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तसेच कर्जदारांना धमकावणे, मानसिक त्रास देणे किंवा दबाव टाकून वसुली करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. दुष्काळग्रस्त नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.











