तीन चिमुकल्यांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; आईसह दोन मुलांचा मृत्यू, एक चिमुरडी मृत्यूशी झुंजतेय
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या महिला कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन चिमुकल्या मुलांसह किल्ल्याच्या परिसरातून दरीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
या दुर्घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा मृत्यू झाला. अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींमधील क्रांतीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुसरी चिमुकली वीरा गंभीर जखमी असून, धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.
‘महाराष्ट्राची वाघीण’ अशी होती ओळख
अश्विनी पौळ या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित महिला कुस्तीपटू होत्या. त्यांच्या आक्रमक खेळामुळे आणि जिद्दीमुळे त्यांना ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखलं जायचं.
कुस्तीचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. त्यांचे वडील, भाऊ, आई आणि बहीण हे देखील कुस्तीशी जोडलेले आहेत. वडिलांनी मुलीच्या सरावासाठी घरातच कुस्तीची तालीम उभी केली आणि याच मातीतून अश्विनी यांनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.
2007 मध्ये केरळमधील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक, त्यानंतर 2008 आणि 2009 मध्येही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी बाजी मारली. आपल्या कारकिर्दीत 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदकांची कमाई करत त्यांनी महाराष्ट्राचा गौरव वाढवला.

मात्र, ज्यांनी कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट केलं, त्या ‘वाघिणी’चा जीवनाशी सुरू असलेला संघर्ष अखेर दुर्दैवी वळणावर येऊन थांबला.
अश्विनी यांच्या वडिलांनी पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
एका राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूचा आणि तीन निष्पाप चिमुकल्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने धाराशिवसह संपूर्ण क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.











