धाराशिव – मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयओआर) कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी नळदुर्ग येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतनगरचे शिक्षक पी. डी. टेकाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. तसेच कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध पोलीस गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) अभियान सुरू आहे. २४२१ तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील ३५२ नळदुर्ग मतदान केंद्रासाठी पी. डी. टेकाळे यांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी पुनरिक्षणाचे कामकाज न केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
तुळजापूर तहसील कार्यालयाकडून टेकाळे यांना प्रत्यक्ष व दूरध्वनीद्वारे वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच १८ फेब्रुवारी व ३० फेब्रुवारी २०२६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी ४ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करून कडक कारवाईची शिफारस केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना टेकाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच तुळजापूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित शिक्षकाविरुद्ध तातडीने पोलीस गुन्हा दाखल करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाच्या पालनात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकार्यांनी दिला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात मतदार यादी पुनरिक्षणाचे काम सुरू असताना काही बीएलओंकडून कामात दिरंगाई होत असल्याने मॅपिंगची टक्केवारी कमी झाल्याची चर्चा आहे. टेकाळे यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.











