कुंथलगिरीच्या डोंगरदरीत २७ वर्षीय गोविंद कागदे यांची निर्घृण हत्या; पत्नी आणि प्रियकराविरोधात वाशी पोलिसांत गुन्हा दाखल
धाराशिव – अवघ्या आठ महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या तरुणाचा संसार प्रेमप्रकरणातून रक्ताने माखल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पत्नीच्या प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील कुंथलगिरीच्या डोंगरदरीत २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून आणि डोक्यात दगड घालून त्याचा जीव घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण वाशी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
डोंगरदरीत आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
गोविंद शिवाजी कागदे (वय २७, रा. गोलेगाव, ता. वाशी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी १२ ते २ वाजण्याच्या सुमारास रामकुंड शिवारात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. सरमकुंडी ते भूम जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या कुंथलगिरीच्या डोंगरदरीत गोविंद यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. तसेच डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आठ महिन्यांपूर्वी विवाह, प्रेमसंबंधातून वादाची ठिणगी
गोविंद आणि अंजली यांचा अवघ्या आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, अंजलीची या विवाहाला संमती नव्हती, अशी माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे. दरम्यान, अंजलीचे शुभम सुभाष खोसे याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा आरोप आहे. या प्रेमसंबंधात गोविंद अडथळा ठरत असल्याने त्यांना संपवण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
पत्नी आणि प्रियकराविरोधात खुनाचा गुन्हा
गोविंद यांचे चुलत बंधू ज्ञानेश्वर बाजीराव कागदे यांनी या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंजली गोविंद कागदे आणि शुभम सुभाष खोसे या दोघांनी संगनमत करून गोविंद यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या फिर्यादीवरून दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तपासातून हत्येचे गूढ उलगडणार
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. हत्या नेमकी कशा पद्धतीने करण्यात आली, त्यामागील कट कसा रचण्यात आला आणि या घटनेत आणखी काही बाबी आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत. आठ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या संसाराचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.











