पंधरा दिवसांत बिल अदा करण्याची परंपरा कायम; प्रतिटन ३,१०० रुपये दराने ऊस बिलाचे वितरण
जागजी – एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि., जागजी कारखान्याने चालू तृतीय गळीत हंगाम २०२६-२७ मधील दुसऱ्या पंधरवाड्याचे ४ कोटी ६० लाख रुपयांचे ऊस बिल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत वर्ग केले आहे. कारखान्याकडे १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत गाळपासाठी आलेल्या १५ हजार मेट्रिक टन ऊसापोटी प्रतिटन ३,१०० रुपये दराने ही रक्कम अदा करण्यात आली आहे.
एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि. जागजी कारखान्याने शेतकऱ्यांचे हित सर्वोच्चस्थानी ठेवून चाचणी गळीत हंगामापासूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अवघ्या पंधरा दिवसांत ऊसाचे बिल अदा करण्याची परंपरा सुरू केली आहे. एन.व्ही.पी. शुगर परिवाराने सुरू केलेली ही परंपरा चालू गळीत हंगामातही कायम ठेवली असून, वेळेत ऊस बिल मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नियोजनासाठी मदत होत आहे.
चालू तृतीय गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये कारखान्याने गाळपासाठी आलेल्या ऊसाचे बिल वेळेत अदा करण्यावर भर दिला आहे. दुसऱ्या पंधरवाड्यात १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या १५ हजार मेट्रिक टन ऊसाचे प्रतिटन ३,१०० रुपये दराने एकूण ४ कोटी ६० लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांना त्यांच्या ऊसाचे पैसे वेळेत उपलब्ध होत आहेत.
दरम्यान, ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या बँक खात्याशी संबंधित कागदपत्रे कारखान्याकडे जमा केलेली नाहीत, त्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव येथील बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत कारखाना साइटवर जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करून आपले ऊस बिल खात्यावर जमा करून घ्यावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन नानासाहेब ऊर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.











