आज कोरड्या दुष्काळाच्या मदतीसाठी स्वाभिमानीचे रास्तारोको आंदोलन.
धाराशिव – जिल्ह्यात तब्बल ४५ दिवसांचा पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे बळीराजा पूर्णपणे कोलमडला आहे. डोळ्यांदेखत कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, ऊस आणि मका ही हाता तोंडाशी आलेली पिके जळून खाक झाली आहेत. घामाचा थेंब न् थेंब गाळून फुलवलेली शेती आज उघड्या डोळ्यांनी उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, पण प्रशासनाला आणि सरकारला याचे कसलेच सोयरसुतक उरलेले नाही.
हवामानाचा लहरीपणा आणि सरकारच्या उदासीनतेमुळे आज मराठवाड्यातील शेतकरी संकटाच्या भीषण गर्तेत सापडला आहे. पीक कर्जाचा डोंगर, खते-बियाणांचा झालेला खर्च आणि आता हातात काहीच न उरल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. अशा परिस्थितीत कोरड्या दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची सढळ हाताने मदत देणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे.
परंतु, ढिम्म झालेली शासकीय यंत्रणा जोपर्यंत जागेवर येत नाही, तोपर्यंत हक्क मिळत नसतात. याच अन्यायाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे रणशिंग फुंकले असून आज (१२ सप्टें) रोजी दुपारी १२ वाजता तुळजापूरच्या जुन्या बस स्टॉपसमोर बेमुदत रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे.
आता आंदोलनाची मशाल पेटली असून हे सरकार स्वतःहून काही देणार नाही, तर ते आपल्याला हिसकावून घ्यावे लागेल. मराठवाडा अध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन आपल्या न्याय हक्कासाठी आणि भावी पिढीच्या अस्तित्वासाठी सर्व बळीराजाने रस्त्यावर उतरायला हवे. बळीराजाच्या आक्रोशाची ही लाट या निष्काळजी सरकारचे सिंहासन हलवल्या शिवाय राहणार नाही











