तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती; विकी चव्हाण आणि बालाजी आण्णा घोलप यांच्या पुढाकारातून विविध रस्त्यांची पाहणी
वाशी – “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार प्रत्यक्ष विकासकामांतून जपण्याचे काम माजी मंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचे चित्र तेरखेडा जिल्हा परिषद गटात पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून तेरखेडा गटात शेतरस्त्यांच्या कामांना विशेष गती देण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर शेतरस्ते करण्यात येतील, असा शब्द आमदार तानाजीराव सावंत यांनी दिला होता. तो शब्द आता प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसत आहे.
समाजकारणाच्या भूमिकेतून निवडणुकीपूर्वीही अनेक शेतरस्त्यांची कामे करण्यात आली होती. आता शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लावली जात आहेत. दिनांक १५ मे रोजी तेरखेडा जिल्हा परिषद गटाचे सदस्य विकी चव्हाण आणि बालाजी आण्णा घोलप यांनी पुढाकार घेत तेरखेडा, खामकरवाडी, सटवाईवाडी आणि कडकनाथवाडी परिसरातील विविध रस्त्यांची पाहणी केली.
यामध्ये नॅशनल हायवे ५२ तेरखेडा ते वडजी रस्ता, सटवाईवाडी रस्ता ते हेडसरी रस्ता, सटवाईवाडी ते बसवेश्वर मंदिर शिवार रस्ता, माणिकदंड ते सटवाईवाडी रस्ता तसेच खामकरवाडी ते उंबरगा रस्त्याची पाहणी करण्यात आली. याशिवाय गोळे शिवार, उकरंडे शिवार, घोलप शिवार आणि हलकरे शिवारातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. संबंधित कामांना लवकर गती देण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी तहसीलदार प्रकाश मेहत्रे, बालाजी हलकरे, कृष्णा माळी, रामलिंग शिंदे, स्वप्निल पोळ, समाधान घोलप, रोहित घोलप यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











