पवन ऊर्जा प्रकल्पांना पोलिसांचे पूर्ण सहकार्य आणि संरक्षण
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील पवन चक्की ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात कामाची अडवणूक करणे, खंडणी, मारहाण करणे, विजेच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण करणे, साहित्य चोरणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पवन ऊर्जा प्रकल्प कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात धमकी देऊन कोणी खंडणी मागत मागत असल्यास त्यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी. या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येईल. पवन ऊर्जा प्रकल्पावर झालेल्या चोरी प्रकरणी काही आरोपींना अटक केली आहे. तर उर्वरित तक्रारी संदर्भात तपास सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी दिली.
धाराशिव जिल्हा हा देशात आकांक्षित जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार पवन व सौर ऊर्जा वर आधारित प्रकल्प मोठ्या प्रमाणावर येत आहेत. जागतिक कंपन्या जिल्ह्यात गुंतवणूक करण्यास तयार असून त्यातून जिल्ह्याची वेगळी ओळख तयार होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात तरुणांना रोजगार व शेतकऱ्यांना मोबदला मिळत आहे. तसेच जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नापीक जमिन असून अशा जमिनीचा वापर पवन व सौर ऊर्जा प्रकल्पा साठी होत असून त्याचा आर्थिक फायदा या भागातील शेतकऱ्यांना होत आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यात पवन उर्जा प्रकल्पाची कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील विविध भागात सुमारे १२ पवन उर्जा कंपन्या पवनचक्की उभारण्याचे काम करत आहेत. या पवनचक्की उभारण्यासाठी अनेक प्रकारचे सुट्टे भाग असतात. प्रकल्प स्थळी हे सुट्टे भाग आणून ते जोडले जातात. हे प्रकल्प शेत शिवार, माळरानावर असतात. मात्र, हे प्रकल्प उभारताना रात्रीच्या वेळी चोरीचे प्रमाण वाढले आहे. अनेक किंमती साहित्य चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
मागील काही महिन्यात या प्रकल्पांवर गुन्हे होत आहेत.मात्र, आजपर्यंत मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंदवले गेले असून, त्यांची चौकशी विविध टप्प्यांवर सुरू आहे. या चोर्याचा मोठा आर्थिक ताण पवन उर्जा कंपन्यावर पडत आहे. त्यामुळे कांही पवन उर्जा कंपन्या या भागातून माघार घेण्याची तयारीत आहेत. तसेच हे एक प्रकारे पोलिस प्रशासनाचे अपयश आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचे हे मोठ्या प्रमाणात न भरून येणारे आर्थिक नुकसान आहे.
पवन ऊर्जा प्रकल्पात घडणारे गुन्हे दाखल करण्यात येतात. मात्र, अनेक प्रकरणात तपास संथ गतीने सुरु असून त्याचा तपास जलदगतीने झाल्यास या गुन्ह्यांना आळा बसेल . त्यामुळे पवन उर्जा कंपन्याला दिलासा मिळून त्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात गुंतवणूक करतील.
या पवन व सौर ऊर्जा कंपन्या जिल्ह्यात प्रकल्प उभारणीसाठीआल्यानंतर त्यांना स्थानिक गावगुंडा कडून मोठ्या प्रमाणात अडवणूक करून खंडणी मागितली जात आहे. 15 दिवसांपूर्वी वाशी तालुक्यामध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांची वाहने अडवून 9 लाख रुपयांची खंडणी मागितली.या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात तिघां विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पवन ऊर्जा प्रकल्प स्थळी या कंपन्यांचे कर्मचारी राहत आहेत. त्यांच्या निवासस्थानी मारहाण करणे, अडवणूक करणे, शिवीगाळ करणे, कामे न करू देणे, दमदाटी करून पैसे घेणे, साईट वरील साहित्याची चोरी करणे, कंपन्यांचे येणारे साहित्य अडवुन ठेवणे,विद्युत प्रवाह मार्गात अडथळे निर्माण करणे, कंपनीचे चालू असलेले काम बंद पाडून दादागिरी केली जात आहे. अशा अनेक प्रकारचे गुन्हे धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत.
.
चौकट
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 4 नोव्हेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जिल्हाधिकारी , पोलिस अधीक्षक इतर अधिकारी, पवन ऊर्जा प्रकल्पांचे प्रतिनिधी आणि शेतकरी यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी पवन उर्जा प्रकल्पात अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत.पोलीस प्रशासनाने त्यांच्या विरोधात तक्रार येण्याची वाट न पाहता सुमोटो (Suo Moto ) गुन्हे दाखल करावेत.अशा गुंडां पासून जिल्ह्यात निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.याबरोबरच संबंधित कंपनीला पवनचक्की उद्योग उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ते सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
चौकट
चोरटे आणि खंडणीखोर यांच्यावर कठोर कारवाई करणार
जिल्ह्यातील पवन उर्जा प्रकल्प संदर्भात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील सर्व पवन ऊर्जा प्रकल्पांच्या आढावा घेतला. पवन ऊर्जा प्रकल्पावर होणाऱ्या चोऱ्या, हाणामाऱ्या आणि खंडणी अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पवन ऊर्जा प्रकल्प कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात धमकी देऊन कोणी खंडणी मागत मागत असल्यास पवन ऊर्जा कंपनी , कर्मचारी यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी. या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येईल. पवन ऊर्जा प्रकल्पावर झालेल्या चोरी प्रकरणी काही आरोपींना अटक केली आहे. तर उर्वरित तक्रारी संदर्भात तपास सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी दिली.











