धाराशिव – जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना दिलासा देणारा आणि तरुणांच्या आशा-स्वप्नांना बळ देणारा नियुक्ती आदेश प्रदान कार्यक्रम ४ ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह,धाराधिव येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.
शासनाच्या सर्वसमावेशक सुधारित धोरणानुसार अनुकंपा नियुक्तीसह महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) निवड झालेल्या उमेदवारांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात येणार आहे.
दि. १७ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत विविध शासकीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गट-क व गट-ड पदांवर अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात आली होती.त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गट-क पदाकरिता १९ अनुकंपाधारकांची आणि गट-ड पदाकरिता ३९ अनुकंपाधारकांची शिफारस विविध विभागांना करण्यात आली आहे.जिल्हा परिषद,धाराशिव येथून गट-क पदाकरिता १ व गट-ड पदाकरिता ३८ अनुकंपाधारकांना तर पोलीस विभागामार्फत गट-ड पदाकरिता २ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे.तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) लिपिक-टंकलेखक (गट-क) या पदाकरिता निवड झालेल्या ४० उमेदवारांना देखील नियुक्ती आदेश वितरीत करण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार जिल्ह्यात अनुकंपा नियुक्ती तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमात एकूण १४७ उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांच्या घरात आनंदाचे सोहळे उजळणार असून, तरुणांच्या कारकिर्दीला नवा वेग मिळणार आहे.रोजगाराची ही नवी संधी म्हणजे शासनाचा लोकाभिमुख निर्णय आणि रोजगाराचा उत्सव ठरणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची यांची उपस्थिती राहणार आहे.











