राजस्थान – खाटू श्यामजींच्या दर्शनावरून (khatu shyam temple) महाराष्ट्राकडे परतत असलेल्या एका कुटुंबाचा शंभूपुरा गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना (Rajasthan Accident) समोर आली आहे. या अपघातामध्ये 9 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, जखमींवर सध्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्रातील धुळे येथील तीन कुटुंबे स्वतंत्र वाहनांतून खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी गेली होती. दर्शनावरून परतताना, रविवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ त्यांची क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की, क्रूझर गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आणि त्यातील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाहून मदतीसाठी पुढे आलेल्या व्यक्तींचे पायही थरथर कापल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच नंता पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने कोटा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचे मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.











