धाराशिव – धाराशिव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 20 चे नगरसेवक तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता सभापती विलास लोंढे यांना कथित अतिक्रमण प्रकरणात अपात्र घोषित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे.
मनसेचे तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपाध्यक्ष राजेंद्र (राजू) कुराडे यांनी अॅड. कांबळे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात अर्ज सादर केला आहे.
अर्जानुसार, विलास लोंढे व त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या गायरान गट क्रमांक 426 मधील जागेवर कथित अतिक्रमण करून तेथे तीन मजली निवासी व व्यावसायिक इमारत उभारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील संबंधित तरतुदींनुसार विलास लोंढे यांचे नगरसेवक पद अपात्र ठरवून रद्द करण्याची मागणी अर्जात करण्यात आली आहे.
या अर्जावर 14 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. त्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट 2026 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.









