धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांसाठी आज पार पडलेल्या निवड प्रक्रियेनंतर सत्तासमीकरण स्पष्ट झाले आहे. या निवडीत भारतीय जनता पक्षाने दोन सभापती पदांवर कब्जा केला, तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना प्रत्येकी एक पद मिळाले.
मात्र या निवडीनंतर राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा रंगली ती धनंजय सावंत यांच्या नावावर. आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात बंड केल्यामुळे चर्चेत आलेल्या धनंजय सावंत यांना भाजपकडून अपेक्षित संधी न मिळाल्याने ‘ठेंगा’ मिळाल्याची चर्चा जोर धरत आहे.
सभापती पदासाठी धनंजय सावंत यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. त्यांच्या दाव्यालाही काही प्रमाणात बळ मिळत असल्याचे बोलले जात होते. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र स्वतः धनंजय सावंत यांनी पक्षप्रवेश टाळत आपली भूमिका जाणीवपूर्वक अस्पष्ट ठेवली होती.
दरम्यान, या सर्व घडामोडींनंतरही सभापती पदाच्या निवडीत त्यांना संधी न मिळाल्याने भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा राजकीय पातळीवर रंगली आहे. त्यामुळे आता धनंजय सावंत येत्या काळात भाजपमध्ये प्रवेश करणार की स्वतंत्र राजकीय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











