परांडा – परांडा येथील न्यायालयाची सध्याची इमारत अपुरी व जीर्ण झाल्याने नवीन शासकीय इमारतीस तातडीने मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
परांडा न्यायालयात येणाऱ्या वकील, फिर्यादी, साक्षीदार आणि नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र सध्याची इमारत जुनी असून जागेअभावी अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होत आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक सुविधा, स्वतंत्र कक्ष, दस्तऐवज साठवणूक व्यवस्था आणि नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष यांचा अभाव असल्याने न्यायालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याचे आमदार सावंत यांनी पत्रात नमूद केले आहे.
नवीन इमारत उभारल्यास न्यायव्यवस्थेला आवश्यक पायाभूत सुविधा मिळतील तसेच वकील व नागरिकांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. परांडा तालुका व परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता न्यायालयाची आधुनिक व सुसज्ज इमारत उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कामासाठी तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार सावंत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे परांडा परिसरातील वकील संघटना व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











