धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषदेच्या तेर गटात निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या उमेदवार सक्षणा सलगर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला वेग दिला आहे. घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेताना त्यांनी विकासाचे स्पष्ट आणि ठोस मुद्दे मांडले.
पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, महिला व युवकांचे प्रश्न यावर नागरिकांनी मोकळेपणाने आपली मते मांडली. या समस्यांवर प्राधान्याने उपाययोजना करण्याचे आश्वासन सक्षणा सलगर यांनी दिले. “सत्ता नव्हे तर सेवा हाच माझा ध्यास असून तेर गटाचा सर्वांगीण विकास हेच अंतिम उद्दिष्ट आहे,” असे त्या म्हणाल्या.

थेट संवादामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून विशेषतः महिला व तरुण वर्गाचा प्रतिसाद उत्स्फूर्त असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विचारधारेला आणि स्थानिक प्रश्नांवर केंद्रित भूमिकेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्षणा सलगर यांचा हा जनसंवाद तेर गटातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.











