धाराशिव – हाबाडा हा शब्द अस्सल गावरान मराठीतला असून बीडच्या मातीतून आला आहे. त्याचा राजकारणातील अर्थ विरोधकांचा अनपेक्षित पराभव, कुरघोडी,बंडखोरी असा होतो,विरोधक मुद्दाम त्याचा चुकीचा अर्थ काढून ओम दादांना बदनाम करण्याचे षडयंत्र करत आहेत असा प्रतिवार युवा सेनेचे तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल काकडे यांच्यावर केला आहे. यावेळी सूर्यवंशी म्हणाले की, भाषणात वेगवेगळे शब्दप्रयाेग करुन विराेधकांना ‘शब्दबंबाळ’ केले जाते. यापैकी एक शब्द ‘हाबाडा’ हा महाराष्ट्राच्या राजकारणात परिचित आहे. हा रांगडा शब्द बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते बाबूराव आडसकर यांची देण आहे. आजही विराेधकांना चीतपट करण्यासाठी बीडसह राज्याच्या राजकारणात ‘हाबाडा’चा वापर होतो. १९७२ चा काळ होता. राज्यात व देशात काँग्रेसची सत्ता होती. मात्र बीड जिल्ह्यात केज मतदारसंघात १९७२ च्या दुष्काळात राबराब राबून आडसकर यांनी जनतेशी नाळ अधिक घट्ट केली हाेती. सन १९६४ मध्ये पंचायत समिती सभापतिपदावरून केलेल्या कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी. याच बळावर काँग्रेसकडून त्यांना १९७२ मध्ये विधानसभेची उमेदवारी मिळाली, परंतु समोर आव्हान होते ते ज्येष्ठ समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांच्यासारख्या बलाढ्य नेतृत्वाचे.अस्सल गावरान शब्दांत ‘औंदा हाबाडा देणारच, विरोधकांचा टांगा पलटी करायचाच, मतदारसंघाचं टिकूर माझ्या हाती द्या मंग दाखवतो विकास’असे विराेधकांना धडकी भरवणारे भाषण बाबूराव करायचे तेव्हा मतदारांकडून त्याला उत्स्फूर्त दाद मिळायची. या निवडणुकीत मतदारांनी बाबूरावांना विजयी केले. ते जेव्हा विधानसभेत गेले तेव्हा काळदातेंना पराभूत करणाऱ्या रांगड्या व्यक्तिमत्त्वाला पाहण्यासाठी पत्रकार व आमदारांचीही गर्दी व्हायची. ‘काळदाते कसे पराभूत झाले?’ असा प्रश्न केला, त्यावर क्षणाचाही उसंत न घेता बाबूरावांच्या तोंडून दोनच शब्द बाहेर पडले, ‘दिला हाबाडा’. इथूनच हाबाडा शब्द राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध झाला. याचा उल्लेख आदरणीय शरद पवार साहेब सुद्धा करायचे. असे असेल तर मग या भाजपच्या लोकांना यात वावगं काय वाटलं ते कळत नाही. या शब्दात असं काय वाईट आहे? हे राहुल काकडे यांनी सांगावं असं प्रतिआव्हान राकेश सूर्यवंशी यांनी दिले आहे.











