धाराशिव – कला केंद्रातील नर्तिकेबरोबर असलेले प्रेम संबंध आणि बायकोचा फोन यामुळे एका तरुणाला आपला हकनाक जीव गमवावा लागला. भांडण विकोपाला गेल्याने तरुणाने केली गळफास घेऊन आत्महत्या. या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
लग्न झाले असताना देखील एका परस्त्रीबरोबर प्रेम संबंध असणे एखाद्याच्या जीवावर बेतते याचे ज्वलंत उदाहरण आज धाराशिव जिल्ह्यातील रुई ढोकी येथे घडले आहे.धाराशिव तालुक्यातील रुई ढोकी येथील राहणारा अश्रुबा कांबळे (वय २५) या तरुणाचे चोराखळी येथील साई कला केंद्रातील एका तरुणी बरोबर प्रेम संबंध गेल्या पाच वर्षापासून होते. सदरील मुलगी व अश्रुबा कांबळे हे देवदर्शनासाठी शिखर शिंगणापूरला गेले होते. देवदर्शन आटपून परत येत असताना अश्रुबा कांबळे यांच्या पत्नीचा फोन आल्यामुळे प्रेयसी व अश्रुबा कांबळे यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले.
भांडण विकोपाला गेल्यामुळे मयत अश्रुबा कांबळे याने प्रेयसीला आत्महत्या करतो असे सांगितले होते परंतू प्रेयसीने दुर्लक्ष केल्यामुळे आश्रुबा कांबळे याचा बळी गेला आहे. येरमाळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मयत अश्रुबा कांबळे यांचे प्रेत पोस्टमार्टम करून नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे. प्रेयसीला येरमाळा पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उपसरपंच असलेले गोविंद बर्गे यांनी देखील कलाकेंद्रातील नृत्यगणा सोबत असलेल्या प्रेम संबंधातून आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच ही दुसरी घटना घडली आहे.











