डबल सेंच्युरी ठोकत अफगाणिस्तानची उडवली धूळधाण
विश्वचषकातील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने निसटला विजय मिळवला. तीन विकेट्स राखून ऑस्ट्रेलियन संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी (7 नोव्हेंबर) थरारक सामना जिंकला. मॅक्सवेल ला दुखापतीमुळे नीट चालता येत नव्हते. पण तिरी देखील त्याने खेळपट्टीवर थांबण्याचा निर्णय घेतला आणि 201 धावांची जबरदस्त खेळी करत संघाला विजय रोमांचक मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाला या सामन्यात विजयासाठी 292 धावांचे आवाहन होते. पण सुरुवातीच्या विकेट्स एका मागोमाग झटपट गेल्या आणि संघ चांगलाच अडचणीत आला. संघाची धावसंख्या 91 असताना ऑस्ट्रेलियाने महत्वाच्या सात विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी महत्वपूर्ण भागीदारी पार पाडली. दोघांनी आठव्या विकेटसाठी 202 धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने या सामन्यात 128 छेंडूत 201 धावांची नाबाद वादळी खेळी केली. यात 21 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे पॅट कमिन्स याने मॅक्सवेलची साथ देत 68 चेंडू खेळत आणि 12* धावा केल्या
ऑस्ट्रेलियाची सलामीवीर जोडी डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी अनुक्रमे 18 आणि शुन्य धावा करून विकेट गमावली. त्यानंतर आलेल्या मिचेल मार्श याने 24, मार्नस लॅबुशेन याने 14, तर यष्टीरक्षक जोश इग्लिस याने शुन्यावर विकेट गमावली. मार्कस स्टॉयनिस (6) आणि मिचेल स्टार्क (3) यांनाही मोठी खेळी करता आली नाही. मॅक्सवेलला दीर्घकाळ खेळपट्टीवर उभा राहिल्यामुळे खेळताना त्रास होत होता. एक वेळ अशीही आली की, त्याला खेळपट्टीवर धावने अशक्य झाले होते. पण तिरीही त्याने मैदान सोडले नाही. कर्णधार पॅट कमिन्सनेही त्याच्यावर विश्वास दाखवला आणि मॅक्सवेल संघासाठी हिरो ठरला. केवळ एका पायावर भार देऊन खेळत असणाऱ्या मॅक्सवेलने एकापेक्षा एक षटकार आणि चौकार या सामन्यात मारले.
उभय संघांतील या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने 50 षटकात 5 विकेट्सच्या गमावत 291 धावा केल्या. यात सर्वाधिक धावा इब्राहिम जादरान याने केल्या. सलामीवीर फलंदाज इब्राहिमने 143 चेंडूत 129* धावांची अप्रतिम खेळी या सामन्यात केली. ऑस्ट्रेलियासारख्या भेदक गोलंदाजी आक्रमाणाला इब्राहिमने अक्षरशः फोडून काढले. इब्राहिम व्यतिरिक्त या सामन्यात एकही अफगाणी फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. शेवटच्या षटकांमध्ये राशिद खान याने 18 चेंडूत 35* धावांची वादळी खेळी मात्र केली.
(हे देखील वाचा – मराठा आणि ओबीसी समाज समोर येण्याला उध्दव ठाकरे जबाबदार)
अफगाणिस्तानसाठी सलामीवीर रहमनतुल्लाह गुरबाझ याने 21, तिसऱ्या क्रमांकावरील रहमत शाह याने 30, कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने 26, अजमतुल्ला अरमझाई याने 22, तर मोहम्मद नबी याने 12 धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानच्या सर्वाधिक दोन विकेट्स जोश हेजलवूड याने घेतल्या. मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि ऍडम झॅम्पा यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. अफगाणिस्तानला या सामन्यात पारभव मिळाला असला, तरी त्यांनी ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाचा घाम काढत त्यांना विजयासाठी झुंजायला लावले.