कळंब – येरमाळा येथील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रा दि.२३ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान असून यात्रेच्या प्रशासकीय नियोजित बैठकीत यात्रेच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेतील विषयावर आधारित आढावा बैठक आज उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली.
या यात्रा नियोजन बैठकीसाठी तहसीलदार विजय अवधाने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक वृषाली तेलोरे, गटविकास अधिकारी आर.व्ही.चकोर, वैद्यकीय अधिकारी एस.डी. बिरादार, बांधकाम उपअभियंता सतिश वायकर, सरपंच मंदाकिनी बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल, माजी सरपंच विकास बारकुल, रणजित बारकुल, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, तलाठी एस. व्ही.गायकवाड, बांधकाम कनिष्ठ अभियंता ए.बी, काळे, मंडळ अधिकारी डीएम कांबळे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता व्ही बी जाधव, देवस्थानचे समाधान बेदरे , अमोल पाटील, संतोष आगलावे ग्रामस्थ, व पुजारी उपस्थित होते.
श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रे बाबत यात्रा नियोजन बैठकीच्या अनुषंगाने यात्रा काळात केल्या जाणाऱ्या तयारी संदर्भात आरोग्य,पाणीपुरवठा,जि.प. बांधकाम विभागाने तयारीची माहिती दिली तसेच ग्रामपंचायतने शुद्ध पाणी पुरवठा आणि मुबलक पाणी पुरवठा बाबत विशेष लक्ष द्यावे असे आवाहन केले तर मंदिर ट्रस्टने मंदिर परिसरात व आमराई परिसरात सी.सी.टिव्ही कॅमेऱ्यांची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, पोलिस बंदोबस्ताच्या जोडीला खाजगी कंपनीच्या सुरक्षा रक्षक तुकडी नेमाल्याचे केल्याचे सांगितले. पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त कामी कर्मचारी अधिकाऱ्यांची व्यवस्था केली असल्याचे पोउनि विलास जाधव यांनी सांगितले. यावेळी चर्चेत यात्रा काळात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या महावितरण कंपनीकडून या दरवर्षीच्या तुलनेत कोणतेच सहकार्य होत नसल्याचे यात्रा काळात विद्युत पुरवठा दुरुस्त्या कामासाठी महावितरण जबाबदारी घेत नसल्याने दिसुन आले तसेच या काळात महावितरणने अनुभवी व्यक्ती ठिकठिकणी देऊन आपले कार्य पार पाडावे व आमराई परिसरातील विद्युत पुरवठा कायम सिंगल फेज कऱण्यात यावा असे सूचित करण्यात आले.