नळदुर्ग किल्ल्यावर सेल्फीचा मोह नडला
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्गच्या किल्ल्यावरील उपल्या बुरुजावर सेल्फी घेताना तोल जाऊन पडल्याने एका नवविवाहित तरुणीचा मृत्यू झाला घटना घडली आहे. निलोफर अमीर शेख (वय २२) रा. हंगरगा (तूळ) ता. तुळजापूर असे या मृत तरुणीचे नाव आहे. चार दिवसांपूर्वीच या तरुणीचे लग्न झाले आहे. नवऱ्यासोबत फिरायला आल्यानंतर ही दुर्घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग हा किल्ला पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. पण या किल्ल्यातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या किल्याची दुरुस्ती आणि देखभाल सोलापूरच्या युनिटी मल्टीकॉन कंपनीला देण्यात आली होती. कंपनीने लाखो रुपये पर्यटकांकडून वसूल केले. मात्र आता मुदत संपली असताना देखील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना धरून वसुली सुरु आहे. मुदत संपूनही युनिटी मल्टीकॉन कंपनीने किल्ला न सोडल्याने या दुर्घनेला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे.
नेमकी कशी घडली दुर्घटना?
धोकादायक ठिकाणी उभा राहून सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना सुटत नाही. मात्र अशा सेल्फीमुळे आपण आपला जीव धोक्यात घालत आहोत याची कल्पना फोटो काढताना येत नाही. अश्या दुर्घटनेच्या घडल्याच्या घटना अनेकदा समोर येत असतात. अश्यातच आता नळदुर्ग किल्ल्यावरील उपल्या बुरुजावर उभा राहून सेल्फी काढताना तोल गेल्यानं एका नवविवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे.
तुळजापूर तालुक्यातली हंगरगा (तूळ) गावची तरुणी आपल्या नवऱ्यासोबत नळदुर्ग किल्ल्यावर फिरायला आली होती. चार दिवसांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं. लग्नानंतर ती नळदुर्ग किल्ल्यावर फिरायला आल्यानंतर किल्ल्यातल्या उपल्या बुरुजावर ती सेल्फी घेत असताना तोल जाऊन ती खाली पडली.
तरुणी बुरुजावरून खाली पडल्यानं गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. निलोफर अमीर शेख असं २२ वर्षीय तरुणीचं नाव आहे.
अधिक अपडेट्स साठी आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करा
सेल्फीच्या नादात जीव गमावल्याने पर्यटकांनी धोक्याच्या ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे तसेच त्या ठिकाणच्या संबंधितांनी सूचना फलक किंवा सुरक्षेच्या उपाय योजना करणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात अश्या मोठ्या दुर्घटना टळण्यास मदत होईल.