धाराशिव – येरमाळ्याची येडेश्वरी ही तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला प्रख्यात आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून येडेश्वरी देवीची ख्याती आहे त्यामुळे तुळजापूरला आलेला भाविक हा येरमाळ्याच्या येडाईला दर्शनासाठी येतोच त्यामुळे नवरात्र महोत्सव काळात याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते
येरमाळ्याच्या येडाईची नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होणार आहे तसेच तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीची घटस्थापनेनेच शारदीय महोत्सवाची सुरुवात होते. नवरात्र काळात तुळजापूर येथे लाखोंच्या संख्येने भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येतात. तुळजापुरला आलेला भाविक हा तुळजाभवानीचे दर्शन झाल्यानंतर श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येतो येडेश्वरीचे दर्शन घेतल्यानंतरच देवीचे दर्शन पूर्ण होते असा भाविकांची श्रद्धा आहे.
श्री येडेश्वरी देवीचा महिमा हा येडी देवी म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे भक्त हा देवीच्या दर्शनासाठी येऊन स्वतःची असणारी अडचण देवीपुढे मांडतो व देवीच्या डोंगरास खेटा घालतो व आपली मनोमन इच्छा व्यक्त करून तो आपल्या गावी परततो. साहजिकच येरमाळा या गावी देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात या नवरात्र महोत्सव काळात वर्दळ असते. वातावरण भक्तीमय निर्माण होते, या काळात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रशासनाने ही याकडे लक्ष देण्याची गरज असून प्रशासनातील प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी हे तुळजापूर येथे ठाण मांडून आहेत परंतु त्यांचे येरमाळ्याच्या येडेश्वरी कडे मात्र दुर्लक्ष आहे.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी देवस्थान ट्रस्टने केलेल्या भाविकांच्या सोयी सुविधांची पाहणी केली व योग्य ते सूचना दिल्या मात्र जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ही येडेश्वरी मंदिराकडे फिरकलेच नाहीत, महसूल प्रशासनातील एखाद्या प्रमुख अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीची पाहणी करणे गरजेचे असताना सुद्धा देखील या प्रशासनातील कुठलाही अधिकारी फिरकला नसल्याचे हे मोठे नवलच म्हणावे लागेल