एमआरपी पेक्षा अधिकच्या दराने विक्री; एमआरपी पेक्षा जास्त दर आकारत विक्रेत्यांकडून ग्राहकांची आर्थिक लूट
धाराशिव – उन्हाचा कडाका वाढल्याने जीवाची काहिली कमी करण्यासाठी अनेक जण शीतपेयांकडे वळत आहेत. ही बाब हेरून धाराशिव शहरात विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक करण्याच्या प्रकारास सुरुवात झाली आहे. विविध प्रकारच्या शीतपेयांची जास्त दराने विक्री केली जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांची आर्थिक लूट होत असून अन्न औषध प्रशासनाचे मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
शहरातील अनेक शीतपेय विक्रेते कूलिंग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांकडून एमआरपी पेक्षा जास्त रक्कम वसूल करत आहेत. वास्तविक घाऊक विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्याला छापील किमतीपेक्षा कमी दराने शीतपेयांचा पुरवठा करण्यात येतो. या शीतपेयांना छापील किमतीत विकले तरीही किरकोळ विक्रेत्याला त्याचा मोबदला मिळू शकतो. मात्र, कूलिंग चार्जेसच्या नावाखाली हे विक्रेते ग्राहकांकडून जास्त रक्कम घेत आहेत. बाजारात मागणी असलेले विविध ब्रँडचे शीतपेय छापील किमतीपेक्षा जास्त दराने विकले जात आहेत. विशेषतः बार्शी नाका परिसर ते हनुमान चौक परिसरातील दुकानात शीतपेये चढ्या दराने विकण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू असून अन्न औषध प्रशासनाने असा गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहे.
ग्राहकांची फसवणूक त्वरित बंद होणे आवश्यक
छापील किमतीपेक्षा जास्त दर लावून शीतपेयांची विक्री करणे अयोग्य आहे. ही ग्राहकांची फसवणूक आहे. दुकानदारांनी अशी फसवणूक करणे त्वरित बंद करावे.
– बालाजी शिंदे, नागरिक