धाराशिव – दरवर्षी १४ डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी ऊर्जा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिक वाढ आणि जीवनशैलीतील बदल यामुळे ऊर्जेची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी ऊर्जा बचत, कार्यक्षम ऊर्जावापर आणि पर्यावरणपूरक हरीत ऊर्जेला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज बनली आहे. जीवाश्म इंधने- कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू-मर्यादित प्रमाणात उपलब्ध असून त्यांच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होते. त्यामुळे शाश्वत, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा पर्यायांकडे वळणे अनिवार्य झाले आहे.
धाराशिवची हरीत ऊर्जा क्रांती
धाराशिव जिल्ह्यातील भरपूर वारा आणि मुबलक सूर्यप्रकाशामुळे अनेक नामांकित कंपन्या येथे पवनऊर्जा आणि सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढे येत आहेत. जिल्ह्यातील विविध भागात आधीच मोठ्या प्रमाणात प्रकल्प कार्यरत असून, त्याद्वारे महत्त्वपूर्ण प्रमाणात वीजनिर्मिती सुरू आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिक शेतकऱ्यांना योग्य आर्थिक परतावा मिळत आहे, रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे, पायाभूत सुविधा मजबूत होत आहेत, जिल्ह्याची विकासगती वेगाने वाढण्याच्या दिशेने सरसावत आहे.
पवनऊर्जा ही स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीची सर्वात विश्वसनीय पद्धत आहे. ऊर्जा संवर्धन म्हणजे केवळ ऊर्जा बचत नव्हे, तर स्वच्छ व नूतनीकरणक्षम पर्यायांना प्राधान्य देणेही महत्त्वाचे आहे. वारा हा अमर्यादित नैसर्गिक स्रोत असल्यामुळे पवनचक्क्यांमधून कोणताही धूर किंवा घातक वायू निर्माण होत नाही आणि हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासही ती प्रभावी ठरते. पवनऊर्जा प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील औद्योगिक आणि पायाभूत विकासाला चालना मिळते, तसेच या प्रकल्पांचा देखभाल खर्च अत्यल्प असल्याने दीर्घकाळ स्थिर दरात वीज उपलब्ध होते. सौर ऊर्जेच्या विपरीत, सूर्यास्तानंतर उत्पादन थांबत नाही, कारण वारा दिवस-रात्र नैसर्गिकरीत्या प्रवाही असल्याने अखंड ऊर्जानिर्मिती शक्य होते.
सेरेंटिका रिन्यूएबल्सचे सीईओ अक्षय हिरानंदानी यांनी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त बोलताना अक्षय ऊर्जेचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. भारत आता अक्षय क्षमता वाढविण्यापासून २४x७ विश्वासार्ह स्वच्छ ऊर्जा पुरविण्याकडे वाटचाल करत आहे. सौर–पवन ऊर्जेची मोठी क्षमता असलेला महाराष्ट्र, २०३० पर्यंत ५०० गिगावॅट लक्ष्य गाठण्याच्या देशाच्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. या क्षेत्राला राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय पाठिंबा मिळत असून, शेतीबाह्य (एनए) प्रक्रिया सुलभ करणारी अलीकडील धोरणे अक्षय ऊर्जेला वेग देणारी आहेत. जमीनमालकांचे हित आणि अक्षय ऊर्जा वाढ यांचा समतोल साधणारी धोरणे—जसे की आयपीपींनी सुचविलेली ३३ केव्ही भरपाई मार्गदर्शक तत्त्वे—ही पुढील वाढीची गुरुकिल्ली ठरतील. पवन आणि सौर ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राला देशातील अग्रस्थान मिळवून देण्यासाठी सेरेंटिका कटिबद्ध असल्याचा विश्वास हिरानंदानी यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन विशेष बद्दल संवाद साधताना ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांनी स्पष्ट केले की पवनऊर्जा प्रकल्पांमुळे पर्जन्यमान कमी जास्त होते किंवा पर्यावरणाचे नुकसान होते, या सर्व अफवा पूर्णपणे निराधार आहेत. सातारा जिल्ह्यात करण्यात आलेल्या अभ्यासातून पवनचक्क्यांचा पर्यावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही हे सिद्ध झाले आहे. ढग साधारणपणे एक किलोमीटर उंचीवर असतात, तर पवनचक्क्यांची उंची त्यापेक्षा खूपच कमी असल्यामुळे त्यांचा पर्जन्यमानावर किंवा स्थानिक हवामानावर काडीचाही अपाय होत नाही.
धाराशिव – भारताच्या हरित ऊर्जा भविष्याचा केंद्रबिंदू
धाराशिव जिल्हा आज पारंपरिक ऊर्जाप्रणालीतून स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीकडे प्रभावीपणे वाटचाल करत आहे. जिल्ह्यात उभे राहत असलेले पवनऊर्जा आणि सौरऊर्जा प्रकल्प केवळ स्थानिक विकासाला चालना देत नाहीत, तर महाराष्ट्राच्या हरित ऊर्जा सामर्थ्याला नवी दिशा देत आहेत. उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती, अनुकूल भूगोल आणि वाढते ऊर्जा गुंतवणूक प्रकल्प यामुळे धाराशिवला आगामी काळात राज्यातील अग्रगण्य हरीत ऊर्जा हब बनण्याची प्रचंड क्षमता आहे. स्वच्छ ऊर्जेच्या नवीन युगात धाराशिवचे योगदान निर्णायक ठरेल, अशी आश्वासक आणि भक्कम पावले जिल्हा आज टाकत आहे.











