भारताचा पुढील सामना कॅनडा सोबत फ्लोरिडामध्ये होणार आहे, जिथे सध्या पूरसदृश परिस्थिती आहे.
टी20 विश्वचषकाच्या अ गटातील भारत हा एकमेव संघ आहे, जो आतापर्यंत सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. भारतीय संघ आपल्या शेवटच्या साखळी सामन्यासाठी मियामीला (फ्लोरिडा) पोहोचला आहे, जिथे आज (15 जून) रोजी भारताचा कॅनडा विरुद्ध सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना फ्लोरिडाच्या लॉडरहिल भागात असलेल्या सेंट्रल ब्रोवार्ड पार्क स्टेडियमवर होणार आहे.
मात्र ह्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे चित्र सध्या आहे. गेल्या काही दिवसांपासून फ्लोरिडाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. कारण मुसळधार पावसामुळे येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे येथील रस्ते पाण्याने ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत, भारत विरुद्ध कॅनडा सामना पूर्ण होईल की रद्द होईल आणि जर सामना रद्द झाला तर त्याचा गट ‘अ’ च्या टेबलवर काय परिणाम होईल हे जाणून घेऊया.
भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना लॉडरहिल येथे होणार असून ‘अ’ गटातील इतर 2 सामने देखील या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. अमेरिकन वेळेनुसार शनिवारी भारत विरुद्ध कॅनडा सामना होणार असून या दिवशी पावसाची शक्यता 80 टक्क्यांहून अधिक आहे. लॉडरहिलमध्ये वादळ येण्याची 52 टक्के शक्यता आहे. फ्लोरिडा येथे सतत पाऊस पडत आहे आणि शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान जोरदार वादळ येण्याची शक्यता आहे. जर हवामानात सुधारणा झाली नाही तर भारत विरुद्ध कॅनडा सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जर पावसामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना रद्द झाला तर दोन्ही संघास 1-1 गूण वाटून दिले जातील. भारतीय संघ 7 गूणांसह अव्वल स्थानी राहील, तर दूसरीकडे कॅनडा संघ 3 गुणांवर पोहचेल. ज्याचा अन्य कोणत्याही संघास फरक पडणार नाही. कारण पाकिस्तान आणि अमेरिका 4 गूणांसह गुणतालिकेत पुढे आहेत.अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात अमेरिकेने हा सामना जिंकून सुपर-8 साठी पात्र ठरला आहे.