वाशी – शासन दुष्काळ निवारणासाठी अनेक उपाययोजना राबवित आहे. त्यात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नवीन तलाव बांधणी, नदी खोलीकरण, तलाव खोलीकरण अशी अनेक कामे दुष्काळ निवारणासाठी शासनाने केली आहेत. २०१४ ला महाराष्ट्रात त्यातल्या त्यात मराठवाड्याला मोठ्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. त्यात शेतकरी मोडकळीस आला होता. जनावरांसाठी चारा छावण्या, नागरिकांसाठी टँकरने पिण्याच्या पाण्याची सोय अश्या अनेक उपाययोजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला २०१४ मध्ये कराव्या लागल्या होत्या. दुष्काळ आणि सतत नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाले होते. राज्यात आणि मराठवाड्यात दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी,नागरिकांचे हाल झाले असल्याने महाराष्ट्र, मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठ्या योजना राबविण्यास शासनाने सुरुवात केली. त्यात वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी साठव तलाव क्रमांक (२) चे काम सुरु करण्यात आले. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निधी उपलब्ध करून लवकरात लवकर तलावाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. ठेकेदाराने काम पूर्ण केले होते,मात्र हे काम पूर्ण झाल्यापासून या तलावाच्या भराव कामातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या तलाव क्षेत्रात हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहेत. मात्र तलावातून पाणी वाया जात असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची, नागरिकांची स्वप्न पाण्यासोबत वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत आहे. नंतर धरण उशाला आणि कोरड घशाला असेच म्हणावे लागेल. परिसरातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा तलाव गळती बाबत संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना दिल्या आहेत. तसेच तलाव गळती संदर्भात भाजपचे वाशी तालुका सरचिटणीस सुधीर घोलप यांनी तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. असा आरोप केला असून कामाची चौकशी करून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हेगारीची कारवाई करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली आहे. तसेच पाणी गळती न थांबल्यास तलावात जलसमाधी देखील घेण्याचा गंभीर इशारा सुधीर घोलप यांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे यापूर्वी दिला होता. संबंधित विभागाने घोलप यांना आपण जलसमाधी घेण्याचा निर्णय माघे घ्यावा आम्ही लवकरात लवकर तलाव गळती संदर्भात उपाययोजना करू असे, आश्वासन दिले होते. मात्र बरेच महिने उलटले असून अद्याप त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अधिकारी ठेकेदारची पाठराखण करत आहेत,असा आरोप देखील भाजप तालुका सरचिटणीस सुधीर घोलप यांनी केला असला तरी तलावाची प्रत्यक्ष सर्व परिस्थिती पाहता तलावातून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग मात्र सुरू आहे. कडकनाथवाडी साठव तलाव क्रमांक (२) च्या बांधण्यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च केले आहेत. गळती न थांबल्यास करोडो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. घोलप यांनी दोषी ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाईची केलेली मागणी आता जिल्हाधिकारी या सर्व प्रकरणावर काय कारवाई करतात हे बघणे गरजेचे आहे.