आयसीसी टी20 विश्वचषकातील सेमीफायनल 2 सामना गुरुवारी (27 जून) रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये खेळला गेला. प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे हा सामना रंगला होता. रोहितच्या सेनेनं या मैदानावर इंग्लंडसमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि भारतानं 172 धावांचा बचाव करत 68 धावांनी इंग्लंडचा धुव्वा उडवला आणि फायनलमध्ये धडक मारली.
भारतानं दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघ सर्वबाद 103 धावा पर्यंतच मजल मारु शकला. त्यामध्ये कर्णधार जॉस बटलर 23, हॅरी ब्रूक, 25, जोफ्रा आर्चरच्या 21 धावांच्या जोरावर इंग्लंडनं 10 गडी गमावून 103 धावा केल्या. भारतासाठी फिरकीपटू अक्षर पटेलनं बटलरला बाद करत विकेट्सची सुरुवात केली. भारतासाठी फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी 3-3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह 2 विकेट्स घेण्यात यशस्वी राहिला.
तत्पूर्वी इंग्लंडनं टाॅस जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात भारतानं इंग्लंडसमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यामध्ये कर्णधार रोहित शर्मानं 39 चेंडूत सर्वाधिक 57 धावांची खेळी खेळली. यादरम्यानं त्यानं 6 चौकारांसह 2 उत्तुंग षटकार ठोकले. तर सूर्यकुमार यादवनं 47 धावांच्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. हार्दिक पांड्या 23, रवींद्र जडेजा 17 धावांच्या जोरावर भारतानं 7 गडी गमावून 171 धावा ठोकल्या होत्या.
इंग्लंडसाठी ख्रिस जाॅर्डननं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले, सॅम करन यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार फिरकीपटू अक्षर पटेलला देण्यात आला. इंग्लंडला पराभूत करुन भारतानं फायनलसाठी तिकीट पक्क केलं. भारत फायनलमध्ये (29 जून) रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे.