धाराशिव – शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असून, पोलीसांचा धाक उरलेला नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. अशाच प्रकारची घटना मंगळवारी (दि. ४ फेब्रुवारी) सायंकाळी घडली. भक्ती बालाजी साळुंके (वय ४१, रा. जुना उपळा रोड, धाराशिव) ही महिला स्कुटीवरून घरी जात असताना अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने ओढून नेली आणि घटनास्थळावरून पसार झाले.
ही चोरीची घटना जिल्हा कारागृहाच्या पाठीमागे सायंकाळी ७.२५ वाजता घडली. अज्ञात चोरट्यांनी अंदाजे ३० ग्रॅम वजनाचे, 30,000 रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले. धक्कादायक बाब म्हणजे या भागात मोठ्या प्रमाणात रहदारी असतानाही चोरटे निर्धास्तपणे पळून जाण्यात यशस्वी झाले.
भक्ती साळुंके यांनी याबाबत आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी भादंवि कलम ३०४(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मात्र, अद्याप आरोपींचा तपास लागलेला नाही. या घटनेमुळे धाराशिव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे
शहरात दिवसाढवळ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. पोलीसांचा धाक कमी झाल्याने गुन्हेगार बिनधास्त झाले असल्याची नागरिकांतून चर्चा सुरू आहे. त्यामुळे पोलीसांनी गस्त वाढवून, अशा घटनांना आळा घालण्याची मागणी होत असून शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचीही आवश्यकता असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे शहरातील सीसीटीव्ही चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.