नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे चांगल्या सिमेंट रस्त्याला तडे गेले.
अंबाजोगाई – स्वयंवर मंगल कार्यालय अनिकेत मंगल कार्यालय सौभाग्य मंगल कार्यालय आणि रघुपती मंगल कार्यालय अशा भोवताली चार मंगल कार्यालय असणारी कॉलनी म्हणजे दुर्गा नगर कॉलनी. विकासाच्या बाबतीत नेहमीच शापित असणारे दुर्गा नगर. इथल्या नागरिकांना आंदोलने आणि संघर्ष केल्याशिवाय आजपर्यंत काहीच मिळालेले नाही. सुरुवातीला अनेक वेळा संघर्ष केल्यानंतर नळ योजना कार्यान्वित झाली. दुर्गा नगर मध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता. अक्षरशः चिखलातून जावं लागायचं. अनेक नागरिकांना दुखापतही झालेली आहे. या रस्त्याच्या कामासाठी दुर्गा नगरवासी यांनी अनेक वेळा नगरपरिषदेसमोर आंदोलने केली निवेदनही दिले एवढेच नाही तर नगर परिषदेच्या पायऱ्यावर बसून ठिय्या आंदोलन सुद्धा केले. त्यावेळी कुठे दुर्गा नगर वाशी यांना सिमेंट रस्ता करून देण्यात आला. पण यात झालेल्या सिमेंट रस्त्याचा बट्ट्याबोळ सध्या केवळ आणि केवळ नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे होत आहे. दुर्गा नगर मध्ये आजही सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाहीत असं जर म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको.

सिमेंट रस्ता झाला परंतु सिमेंट रस्त्याच्या दोन्ही साईडला नाली काम न झाल्यामुळे साईड पट्टी ही भरण्यात आलेली नाही. त्याचा परिणाम असा झाला की सिमेंट रस्ता चांगला करूनही या रस्त्याला साईड पट्टीचा दबाव नसल्यामुळे तडे गेले. आज या रस्त्याचा आयुष्य संपल्यात जमा आहे. दुर्गा नगर मधील ओपन स्पेस नगर परिषदेच्या नावे करून घेण्यात यावा म्हणून नगरपरिषदेला यापूर्वीच निवेदने सुद्धा दिलेली आहेत. पण दिलेले निवेदन नगरपरिषदेमधून गायब होते. त्याची कुठेच दखल घेतली जात नाही अथवा नोंदही घेतली जात नाही. प्रत्येक वेळेला हो असं म्हणून तोंडाला पाने पुसली जातात. दुर्गा नगरच्या समोरील मुख्य रस्ता आमदार महोदय यांनी अत्यंत सुंदर बनवून घेतलेला आहे. पण आज या रस्त्याची जी साईड पट्टी आहे या साईड पट्टी खाली नवीन पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आलेली आहे. या साईड पट्टीमध्ये बाभळीची झाडे इतकी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहेत की आपण जणू काही जंगलातच उभे आहोत असा भास होतो. या वाढलेल्या बाभळीच्या झाडामुळे पाईपलाईनलाही धोका आहे नालीलाही धोका आहे आणि रस्त्यालाही धोका आहे. पण याकडे नगरपरिषद कर्मचाऱ्यांची साफ दुर्लक्ष आहे. नगरपरिषद कार्यालयात बसून आयत्या पिठावर रेगोट्या वडणाऱ्या या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आता जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे विद्यमान आमदारांनी अंबाजोगाई चा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी कोट्यावधी रुपयाची विकास कामे खेचून आणून अंबाजोगाई शहराला अद्यावत बनवण्याचे काम चालू आहे. आणि नगरपरिषदेचे कर्मचारी मात्र झालेल्या विकास कामाचा बट्ट्याबोळ कसा होईल यासाठीच प्रयत्न करत आहेत की काय अशी शंका येते.