धुळे – मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा धुळे जिल्ह्यातील तरुण ओमानच्या समुद्रात बेपत्ता झाला आहे. धुळे जिल्ह्यातील देऊर गावातील मूळ रहिवासी असलेला यश अविनाश देवरे हा जुलै 2024 साली मर्चंट नेव्हीमध्ये भरती झाला होता. 21 वर्षांचा यश देवरे हा ठाण्यातील स्वराज मराइन सर्व्हिस प्रा.लि. मध्ये ओएस या पदावर कार्यरत आहे.
यश गायब झाल्याचा मेल
यश हा जहाजासोबत ओमानला गेला, 28 जानेवारीला संध्याकाळी यशचं त्याच्या कुटुंबासोबत बोलणं झालं. मात्र त्यानंतर घरच्यांचा यशसोबत संपर्क होऊ शकला नाही. यश देवरे हा बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती संबंधित जहाज कंपनीने 29 जानेवारीला मेलद्वारे देवरे कुटुंबाला दिली.
यश कुठे गेला? कुटुंब चिंतेत
मेल मिळाल्यानंतर देवरे कुटुंबाने जहाज कंपनीशी संपर्क साधला, पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, असं देवरे कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे. यश कार्यरत असलेलं जहाज ओमानहून गुजरातच्या अलंग येथे या आठवड्यात येणार होते, मात्र हे जहाज किती वाजता येईल, त्याची माहिती यंत्रणेकडून दिली जात नाही, अशी तक्रार देवरे कुटुंबाची आहे. मुलासोबत कोणताही संपर्क न झाल्यामुळे देवरे कुटुंब मागच्या आठवड्यापासून चिंतेत आहे.