टिकेची झोड होऊ लागल्याने पत्र काढत व्यक्त केली दिलगिरी
धाराशिव – धाराशिव चे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा तुळजापूर येथील सांस्कृतिक महोत्सवातील डान्स चा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच सरातून टीका व्यक्त होत होती. या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण देखील तापले होते.सर्वच स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. यांनी डान्स प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.
काय लिहिलं आहे पत्रामध्ये?
आई तुळजाभवानीच्या कृपेनेच आपत्तीग्रस्तांच्या मदतीची जबाबदारी तसेच शोध व बचाव कार्य पार पाडत आहे. हे सगळे काम सुरू असताना तुळजाभवानी मंदिर समितीचा अध्यक्ष या नात्याने नवरात्र महोत्सवातील घडामोडींकडेही अगदी काळजीपूर्वक लक्ष देणे ही देखील मंदिर संस्थान समितीचा अध्यक्ष या नात्याने माझी जबाबदारी आहे. त्यामुळे अगदी खूप कमी वेळेसाठी आपण महोत्सव स्थळाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. मंचावरील कलाकारांनी मंदिर समितीचा अध्यक्ष या नात्याने मंचावर येण्याची आग्रहपूर्वक विनंती केली. सभागृहातील सर्व उपस्थितांना त्यांनी तुळजाभवानी देवीच्या स्तवनावर ठेका धरण्याची विनंती केली. आई तुळजाभवानी देवीच्या स्तवनांमध्ये कोणीही तल्लीन होतो. जिल्हाधिकारी असलो तरीही मी एक भाविक भक्त म्हणून कलाकारांना प्रोत्साहन देणे हे माझे काम असून मी ते पार पाडलेले आहे. माझ्या या कृतीमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा कोणाला वाईट वाटत असेल तर मी व्यक्तिशः त्यांची दिलगीरी व्यक्त करतो.
असे पत्रक जाहीर करून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र दिलगिरी व्यक्त केल्याने सर्व प्रश्न सुटणार आहेत का असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.











