धाराशिव – बीड नगरपालिकेच्या वादग्रस्त मुख्याधिकारी नीता अंधारे यांची तडका फडकी बदली करण्यात आली असून धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अंधारे यांच्या कार्यकाळामध्ये बीड नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार सुरू होता अनेक वेळा अनेक लोकांकडून तक्रारी गेल्यानंतरही नीता अंधारे यांना सातत्याने पाठीशी घातले जात होते. नगरपालिकेमधील डिझेल घोटाळ्यासह बीड शहरातील नागरिकांसाठी कुठल्याही मूलभूत गरजा दिल्या जात नाहीत शहर अस्वच्छतेचे माहेरघर बनला आहे यासह अंधारे यांच्या मनमानी कारभाराचे वृत्त माध्यमांमध्ये प्रकाशित झाले आहे.
बीड नगरपालिकेच्या दोन ते अडीच वर्षाच्या कालखंडात कुठल्याही कामाची पाहणी केली तर त्यामध्ये अनागोंदीपणा समोर येतो अनेक टेंडर मध्ये तडजोड आणि भ्रष्टाचार उघडपणे दिसून येत असल्याचा तसेच बीड शहरात लोकांना पिण्यासाठी पाणी नसणे, शहर अस्वच्छ असणे नगरपालिका लोकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणे हे केवळ नीता अंधारे यांनी बीड नगरपालिकेचा चार्ज घेतल्यानंतर सर्व अनागोंदी प्रकार सुरू झाला असल्याचे त्या ठिकाणच्या नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षभराच्या कालखंडात अंधारे यांच्या विरोधात शासन प्रशासन दरबारी अनेक तक्रारी गेल्या मात्र त्या तक्रारींची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जात नव्हती गेल्या आठ दिवसाच्या कालखंडात बीड नगरपालिकेचा अनागोंदी कारभार, बीड शहरातली स्वच्छता असो नाल्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार असो अथवा डिझेल भ्रष्टाचार असो यासह अन्य भ्रष्टाचाराबाबतचे वृत्त सातत्याने प्रकाशित झाले आहे. अखेर अंधारे यांची बदली करून धाराशिवच्या मुख्याधिकारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून धाराशिव नगरपालिकेचा कारभार अंधारे कसा पाहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.