धाराशिव – जिल्हा प्रशासनाने मोठ्या गाजावाजा करत ‘हरित धाराशिव’ या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. येत्या शनिवारी, १९ जुलै रोजी, एकाच दिवशी तब्बल १५ लाख झाडे लावण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे. मात्र, या महासंकल्पाच्या अंमलबजावणीत सुरुवातीलाच मोठा घोळ आणि हलगर्जीपणाचा कळस समोर आला असून, ही योजना केवळ कागदोपत्री देखावा ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
उमरगा तालुक्यातील खसगी गावातील प्रकार तर प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा उत्तम नमुना आहे. येथे सहा हजार झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम झाले आहे. पण शासकीय नियमानुसार किमान एक फूट खोल खड्डा आवश्यक असताना, येथील खड्डे अर्धा फूटही खोल नाहीत. हा प्रकार म्हणजे पर्यावरणाची क्रूर थट्टाच आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, रोपवाटिकेतून आणलेली रोपे त्यांच्या कॅरीबॅगसकट या उथळ खड्ड्यांमध्ये बसतही नाहीत.

ही परिस्थिती केवळ खसगी गावची नसून, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हेच भयाण वास्तव पाहायला मिळत आहे. मग प्रश्न पडतो की, १५ लाख झाडे लावण्याचा हा संकल्प पूर्ण कसा होणार? अशी वरवर लावलेली झाडे जगणार कशी?
आजपर्यंत जिल्ह्यात कोट्यवधी झाडे लावण्याचे कार्यक्रम झाले, त्यावर लाखो रुपये खर्च झाले. पण त्यातील किती झाडे आज जिवंत आहेत, हा संशोधनाचाच विषय आहे. आताही तोच प्रकार पुन्हा घडत असेल, तर हा शासकीय निधीचा आणि लोकांच्या श्रमाचा घोर अपमान आहे. केवळ फोटोसेशन आणि कागदी घोडे नाचवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे का? असा संतप्त सवाल आता पर्यावरणप्रेमी आणि सामान्य नागरिक विचारत आहेत.
जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा ‘हरित धाराशिव’ हे केवळ एक दिवास्वप्न ठरेल आणि १५ लाख रोपांची ‘हत्या’ झाल्याची नोंद इतिहासात होईल, हे निश्चित!











