धाराशिव – धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पवनचक्की कंपनीच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याची तब्येत खलावली आहे.
वाशी तालुक्यातील पारा, लाखणगाव, तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून पवनचक्की कंपन्यांच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्यांना पवनचक्की कंपन्यांनी योग्य मोबदला न दिल्याने हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील उपोषण वाशी येथील तहसील कार्यालयासमोर
झाले होते. या उपोषणाला खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी भेट देत पवनचक्की कंपनी व शेतकरी यांच्यामध्ये मध्यस्थी करत उपोषण सोडवले होते. तोडगा निघेल या आशेने शेतकऱ्यांनी देखील उपोषण मागे घेतले होते. मात्र, जवळपास पंधरा दिवस उलटून देखील शेतकऱ्यांना पवनचक्की कंपन्याने कोणताही प्रतिसाद न दिल्याने तसेच उपोषण सोडवून शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच त्यांनी पुन्हा एकदा धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली.
या उपोषणाला भाजपचे सुजितसिंह ठाकूर यांनी भेट देत जिल्हाधिकारी कार्यालयात पवनचक्की कंपन्यांचे अधिकारी शेतकरी व प्रशासन यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, या चर्चेला रिन्यू कंपनीचे अधिकारी गैरहजर राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अशातच आता गुरुवारी रात्री एका उपोषणकर्त्या शेतकऱ्याची तब्येत खालावली आहे. प्रशासन तसेच रुग्णवाहिकेला संपर्क करून देखील वेळेवर कोणीही दाखल न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण झाली आहे.