पत्नी व दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या
धाराशिव – धाराशिव तालुक्यातील बावी या गावात एका 29 वर्षीय तरुणाने ऑनलाइन गेममुळे कर्जबाजारी झाल्याच्या तणावातून स्वतःच्या पत्नी व दोन वर्षाच्या चिमुकल्याचा विष देऊन खून केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
लक्ष्मण मारुती जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. अडीच वर्षांपूर्वी त्याने तेजस्विनी या तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांच्या दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा होता. लक्ष्मण हा गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमच्या आहारी गेला होता. गेम खेळता खेळता त्याने लाखो रुपये गमावले. या आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी त्याने स्वतःची एक एकर जमीन आणि गावातील प्लॉट विकला. तरीही त्याचे कर्ज फिटले नाही. त्यामुळे तो सतत मानसिक तणावात असल्याची चर्चा आहे.
रविवारी रात्री त्याने पत्नी आणि मुलाला विष पाजून ठार मारले आणि त्यानंतर स्वतः घरात गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचताच दरवाजा फोडून आत शिरले. घरात तिघांचेही मृतदेह आढळले असून पोलिसांनी तत्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी करत संबंधित पोलीसांना सखोल तपासाचे आदेश दिले असून, ऑनलाइन रम्मीमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व मानसिक परिणामांवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.