कळंब – कळंब शहरात पोलीस असल्याचे सांगून एका ५१ वर्षीय महिलेला तब्बल २ लाख २० हजार रुपयांचे मंगळसूत्र गंडवण्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी शासकीय विश्रामगृहाजवळ घडली.
सविता सुब्राव लांडगे (वय ५१, रा. दत्तनगर, कळंब) या महिला कळंब येरेमाळा रस्त्यावरून दत्त मंदिराकडे पायी जात होत्या. त्यावेळी एमएसईबी सबस्टेशनजवळ एका अज्ञात व्यक्तीने त्यांना थांबवले आणि हिंदीत सांगितले
“माताजी, यहाँ पे पद्मा टीचर का मर्डर हुआ है, हम पुलीसवाले है,
असे सांगून त्या व्यक्तीने आपले ओळखपत्रही दाखवले. पुढे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी गळ्यातील मंगळसूत्र काढून सुरक्षित ठेवण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्या साथीदाराला बोलावून त्यानेही महिलेला हातातील अंगठी काढून ठेवण्यास सांगितले.
त्याच्यावर विश्वास ठेवून सविता लांडगे यांनी मंगळसूत्र आपल्या बगेत ठेवले. पण त्याच वेळी भामट्यांनी संधी साधत हातचलाखीने बॅगेतून २५ ग्रॅम वजनाचे, अंदाजे २ लाख २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केले आणि जवळच थांबलेल्या मोटारसायकलवर बसून पळून गेले.
या प्रकारानंतर लांडगे यांनी तत्काळ कळंब पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध IPC कलम ३७९(२) (चोरी) आणि ३०३(२) (लोकसेवकाची तोतयागिरी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींचा शोध घेत आहेत.