तुळजापूर – धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील गाजत असलेल्या ट्रक प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे . तामलवाडी पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात ड्रग्स सह विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला अटक केली होती. याबाबतचा तपास सुरू झाल्याने मुळे याचे राजकीय कार्यकर्त्यांशी संबंध असल्याचे उघडकीस आले होते. ड्रग्स प्रकरणात याआधी 18 आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. राहुल परमेश्वर कदम याला अटक केल्याने ड्रग्ज प्रकरणात आणखी एका आरोपीची भर पडली आहे.
तुळजापूर ट्रक प्रकरणात 19 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी दहा जणांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे तर दोन आरोपी अद्याप देखील फरार आहेत तर चार आरोपींची नावे गोपनीय असून दोन आरोपींना 5 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार असून एक जण अटकेत आहे. ड्रग्ज प्रकरणात आगामी काळात आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अटक करण्यात आलेला विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून आज अटक करण्यात आलेला राहुल कदम परमेश्वर आणि सुमित शिंदे हे देखील एका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ‘मुख्य’ नेत्याच्या बॅनर वर झळकले असल्याने आरोपी हा नेत्यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा जोर धरू लागली असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे हात देखील ड्रग्स प्रकरणात काळे झाल्याचे समोर येत आहे. राहुल कदम परमेश्वर या आरोपीच्या कुटुंबाचे पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे देखील समोर आले आहे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला असून तुळजापूर सारख्या पवित्र तीर्थक्षेत्री अशा प्रकारचे गैरकृत्य घडत असल्याने ही बाब अतिशय गंभीर असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे ड्रग्स प्रकरणाचा सुळसुळाट वेळीच थांबून या प्रकरणात नि:पक्षपातीपणे तपास करून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.