ढोकी येथील साखर कारखान्याचा मोळीपूजन व प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ
धाराशिव दि,१४ (जिमाका) ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.यामुळेच ग्रामीण भागात अनेक प्रकारचे रोजगार,व्यवसाय आणि उद्योगधंदयाना चालना मिळते. भैरवनाथ उद्योग समूहाने तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना त्यामुळेच चालविण्यासाठी घेतला आहे.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा पहिला मोळीपुजन सोहळा आणि प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ आज १४ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी माजी खासदार रविंद्र गायकवाड,ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज,तेरणा साखर कारखान्याचे चेअरमन प्रा.शिवाजी सावंत,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत,कारखान्याचे वाईस चेअरमन अनिल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत पुढे म्हणाले की,शेतकरी बांधवांना यावर्षी उसाच्या पहिल्या उचलसाठी २८२५ रुपये भाव देण्यात येईल.सर्वसामान्य शेतकरी,मजूर,ऊस उत्पादक,उसाची वाहतूक करणारे वाहतूकदार यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी हा कारखाना आम्ही जिवंत केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही हा कारखाना आमच्या सुपूर्द करताना आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचा आभारी आहे.तेरणा कारखान्याच्या नव्याने सुरू होत असलेल्या हंगामामुळे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होईल.स्थानिकांना देखील रोजगार मिळेल.गावाच्या व पंचक्रोशीतील गावातील नागरिकांच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल. त्यामुळे हा कारखाना कायम सुरू ठेवण्याची जबाबदारी येथील शेतकरी बांधवांची आहे.
तेरणा साखर कारखाना गेली १२ वर्ष बंद होता. भैरवनाथ उद्योग समुहाने तो आगामी २५ वर्षासाठी भाडेतत्वावर घेतला आहे,असेही पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यावेळी म्हणाले.
माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि बोधले महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन शिवाजी सावंत यांनी केले.संचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले.आभार अनिल खोचरे यांनी मानले.या कार्यक्रमात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी ऊसतोड कामगार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.