बार्शी – बार्शी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे; पत्नी आणि मुलाची हत्या करून शिक्षक पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
ह्याबाबत सविस्तर वृत्त असे की,बार्शी शहरातील उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे शिक्षक पतीने आपल्या शिक्षक पत्नीचा गळा कापून व आपल्या 11 वर्षाच्या मुलाच्या तोंडावर उशी ठेवून हत्या केली. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने बार्शी शहरात मोठी खळबळ उडाली.
अतुल सुमंत मुंढे (वय ४०), तृप्ती अतुल मुंढे (वय ३५) ओम सुमंत मुंढे (वय 11) असे त्या मयत तिघांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर तृप्ती मुंढे या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. दोघेही उपळाई रोडवरील आपल्या घरात वरच्या मजल्यावर राहत होते. खालच्या मजल्यावर अतुल मुंढे यांचे आई- वडील राहतात. वरच्या मजल्यावरील कोणीही खाली न आल्याने अतुल यांच्या आई-वडिलांनी मंगळवारी सकाळी वर जावून पाहिले असता ही घटना उघडकीस आली.
(हे देखील वाचा – ठाकरे गटाची लोकसभेसाठी ‘या 10’ नेत्यांवर मोठी जबाबदारी)
त्यानंतर तात्काळ बार्शी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेने बार्शी शहर व परिसरात खळबळ माजली आहे. मात्र या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सुशिक्षित दांपत्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने हे धक्कादायक मानले जात आहे.