नागपूर – मागील सरकारमधील अहंकारी नेत्यांमुळे जनतेचे नुकसान झाले आहे. आम्हाला दिल्लीची कठपुतली म्हणणाऱ्यांनो, तुमचे सत्तेचे दोर नागरिकांनीच कापून टाकले आहेत. आमच्या सरकारचा विकासकामांवर भर असून आमच्या दोऱ्या जनतेच्या आणि लोकशाहीच्या हातात आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
राज्याचे हिवाळी अधिवेशन आज पासून (गुरुवार) नागपुरात सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. शिंदे यांनी नुकत्याच पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष्य केले. ‘पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तीन राज्यांत भाजपला यश मिळाल्याने विरोधी पक्षाचे अवसान गळाले आहे. लोकशाहीमध्ये जनता जनार्दनाचा कौल महत्त्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा संपला असे म्हणणाऱ्यांना देशातील जनतेने जागा दाखवून दिली असून त्यांनी मोदी यांच्या गॅरंटीवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील याची हमी आता जनतेनेच देऊन टाकली आहे’, असे शिंदे म्हणाले.
‘आमच्याकडे स्वाभिमान नसल्याचे विरोधक सांगत आहेत. वास्तविक ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची परवानगी नाही, त्यांनी आमच्यावर आरोप करायचे? स्वाभिमानाची भाषा करायची? आम्ही दिल्लीला केंद्रातून निधी आणण्यासाठी जातो. राज्याच्या विकासासाठी निधी मागितल्याशिवाय मिळत नाही. त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. गेल्या अडीच वर्षांत अंहकारामुळे हे घरातून बाहेर पडले नाहीत. त्यांच्या अहंकारामुळे केंद्र सरकारने पैसे दिले नाहीत. राज्याचे नुकसान झाले. अनेक प्रकल्प बंद पाडले तर यांनी काही प्रकल्प स्थगित केले. आमचे सरकार आल्यापासून मेट्रो, आरेपासून अनेक प्रकल्प सुरू केले. हे सर्व प्रकल्प बंद पाडण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी जलयुक्त शिवारसारख्या प्रकल्पाची चौकशी सुरू केली’, अशा शब्दांत शिंदे यांनी विरोधकांवर आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षावर टीका केली.